नागराज गेल्या कित्येक महिन्यांपासून झुंड या हिंदी चित्रपटावर काम करत असून बॉलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नागराज यांनी आज केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची अनेक कलाकारांची इच्छा आहे. नागराजने आज इतके यश मिळवले असले तरी त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत.
नागराज हे मुळचे सोलापूरमधील असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात ते लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्या आई-वडिलांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे त्यांचे वडील पोपटराव यांच्याकडून त्यांचा भाऊ बाबूराव यांनी नागराजला दत्तक घेतले. नागराज यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहाण्याची प्रचंड आवड होती. त्यासाठी ते अनेकवेळा शाळेला देखील दांडी मारत असत. नागराज यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज त्यांचे प्रस्थ निर्माण केले आहे.
नागराज यांच्या जेऊर या गावात त्यांच्या वडिलांनी बांधलेले एक घर असून नागराज आजही गावी गेल्यानंतर त्याच घरात राहातात. नागराज यांचे हे घर पूर्वी खूपच साधे होते. पण सैराटच्या यशानंतर या घराला रंग देऊन त्याची डागडुजी नागराज यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment